Home ताज्या घडामोडी आश्रम शाळेच्या भ्रष्ट संचालकांची ग्रामपंचायत कडून पाठराखण कशासाठी ?

आश्रम शाळेच्या भ्रष्ट संचालकांची ग्रामपंचायत कडून पाठराखण कशासाठी ?

0

शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता व पायाभूत सोई सुधारण्यासाठी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी कधीच घेतले नाहीत ठराव

वाशिम – जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात निवासी असलेल्या भटके व विमुक्त या मागासवर्गीय नागरिकांच्या मुलांचे भवितव्य घडावे या उदात्त हेतूने खाजगी शिक्षण संस्थांना बक्कळ अनुदान देऊन शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांमधील अनागोंदी, भ्रष्टाचार, विद्यार्थ्यांची उपासमार, विद्यार्थिनींचे संरक्षण न करणे असे शासकीय समितीच्या चौकशी अंति निष्पन्न होऊनही राजकारणापोटी ग्रामपंचायत पदाधिकारी मात्र शासनाकडून भ्रष्ट ठरविले गेलेल्या संस्था संचालकांचे पाठराखण करण्यामागील कारण काय? असे सवाल या निमित्याने तालुक्यातील भटके विमुक्त समाजामध्ये चर्चिल्या जात आहेत.
तालुक्यातील गरीब,गरजू मागासवर्गीय भटक्या विमुक्त समाजाच्या विद्यार्थ्यांचेच नुकसान या पाठराखणीमुळे होणार असून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मुले या निवासी आश्रम शाळेत सध्यातरी शिकत नसल्याने व इतर काही आमिषे भ्रष्ट संस्था संचालकांकडून स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकाऱ्यांना मिळत असतील अशी सुद्धा चर्चा वाई गौळ वर्तुळात सुरू आहे. त्याचे कारण असे की, नियमानुसार तपासणी केल्यानंतर चौकशी समीतीने प्रशासक नेमण्याची शिफारस केल्यानंतर ग्रा.पं. वाईगौळने मात्र दोषींची बाजू घेत प्रशासक नेमू नये असा बेकायदेशीर ठराव घेतला आहे. वाईगौळ आश्रमशाळा सध्या बंद होणार किंवा स्थलांतरित होणार हा प्रश्न कुठेच उपस्थित झालेला नसतानादेखिल अशाप्रकारे ठराव घेणे कितपत योग्य हे आता तपासणे गरजेचे झाले आहे.
तालुक्यामध्ये सध्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा शासनाकडून शतप्रतिशत अनुदान प्राप्त निवासी आश्रम शाळा सहा गावांमध्ये गरीब व गरजू भटके विमुक्त नागरिकांच्या पाल्यासाठी चालविल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांनी फुलउमरी आणि दापुरा येथील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक निवासी आश्रम शाळांच्या अनियमितता,विद्यार्थ्यांना सोयी सुविधा न पुरविणे, विद्यार्थी शाळेत वस्तीगृहामध्ये नसतानाही शासनाची व भटके विमुक्त समाजाच्या नागरिकांची फसवणूक व इतर कारणाच्या आधारे प्रशासक नेमण्याचे पत्र जारी केले होते.
तालुक्यातील इतरही काही आश्रम शाळांची अवस्था वरील प्रमाणेच असून केवळ आपले आर्थिक हितसंबंध जपण्यापोटी दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या व स्थलांतरिताचे जीवन जगणाऱ्या आणि ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे आणि अत्युत्तम भौतिक सुविधांनी सज्ज वस्तीगृहात राहण्याची सोय या विद्यार्थ्यांची करण्यात यावी यासाठी वर्षापोटी कोट्यावधी रुपयाची वेतन आणि वेतनेतर अनुदान संबंधित शाळा व्यवस्थापनांना शासनाकडून दिले जाते. याकडे ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांकडून डोळेझाक केली जात असावी असेही नागरिक शंका व्यक्त करीत आहेत.
या निवासी आश्रम शाळांना शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाला दुसरीकडेच पाय फुटत असल्याने अशा भ्रष्ट खाजगी शिक्षण संस्था संचालकांची पाठराखण करण्यामागचा वाई गौळ ग्रामपंचायतने घेतलेल्या ठरावाचा हेतू आहे की काय?अशी शंका पंचक्रोशीमध्ये आता चर्चिली जात आहे.
शाळा बंद करणे, स्थलांतरित करण्यासंदर्भात तक्रारकर्त्याने तक्रारीत कुठेच नमूद केलेले नाही. तक्रारकर्ते स्थानिक आणि उच्चशिक्षित जबाबदार नागरिक असल्याने विद्यार्थ्यांच्या हिताला अनुलक्षूणच शासन व प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे. स्थानिक व इतर ठिकाणावरून आलेल्या गरीब व मागास विद्यार्थ्यांना संस्था व्यवस्थापन शासकीय निकषाप्रमाणे मूलभूत सोयीसुविधा आणि दर्जेदार शिक्षण देण्यात सातत्याने अपयशी ठरत असल्याने येथे प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी केलेली आहे,याची माहिती बहुधा सर्वानुमते ठराव घेणाऱ्या ग्रामपंचायतीला आहे की नाही यासंदर्भात ही उलट सुलट चर्चांना आता उधान येत आहे.

वाईगौळ या तीर्थक्षेत्राचे नाव मागील काही दिवसांपासून शाळा व्यवस्थापनाच्या भ्रष्ट कारभारामुळे चव्हाट्यावर येत असताना शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना दिल्या जात असलेल्या मूलभूत सुविधांमध्ये उणिवा असल्यास त्या शाळा प्रशासन पुर्ण करेल असा ठराव घेणे चुकीचे असून, जर शाळा प्रशासनाने शासनाचेच ऐकलेले नाही तर ग्रा.पं.आता हमी घेत असल्यास शाळेने पुर्ण न केल्यास ग्रामपंचायत निधितून वा स्व निधीमधून ग्रामपंचायत सदस्य करणार आहे का?, हे महत्त्वाचे आहे.

आश्रम शाळेतील चौकशीत ग्रामपंचायत नाहक ढवळाढवळ करीत आहे.गावातील अनेक गंभीर समस्या प्रलंबित असताना त्याकडे दुर्लक्ष करून राजकीय स्वार्थापोटी अधिकार नसताना बेकायदेशीर उपदव्याप ग्रा.पं.करीत आहे.
-उमेश हरसिंग राठोड, वाई गौळ

१८ जुलै रोजी ग्रामपंचायत द्वारे स्थानिक प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळे संदर्भात घेतलेल्या ठरावा व्यतिरिक्त इतर कुठलाही ठराव घेण्यात आलेला नाही.

– ग्रामसचिव ,वाई गौळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here